सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

साईबाबा



   श्री बाबांचा जन्म महाराष्ट्रातील पाथरी या खेड्यात भुसारी कुटुंबात झाला. पण ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लीम फकिराने केले. नंतर बारा वर्षे त्यांनी योग्यांच्या सहवासात राहून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. साधना करण्यातही त्यांनी काही काळ व्यतीत केला. नंतर ते हुमणाबादच्या श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना आशीर्वाद मिळून शिर्डी येथे राहण्याची त्यांना आज्ञा झाली. माणिक प्रभू यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले होते. प्रभू हे प्रत्यक्ष परमेश्वरच होते. बाबा त्यांना मानत होते.  
 
     औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावची चांदभाई ही एक श्रीमंत व्यक्ती. औरंगाबादची सफर करण्यास चांदभाई गेला असता त्याची घोडी हरवली. त्याने सर्व जंगल शोधले, परंतु घोडी त्याला सापडली नाही. निराश बनून खोगीर पाठीवर मारून तो परत जाऊ लागला. एवढ्यात ''चांदभाई !'' अशी हाक त्याच्या कानी आली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. त्याच्या दृष्टीस एक तरुण फकीर दिसला. अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकडे ये.'' अस म्हणून तो फकीर एका झाडाखाली बसला. 'याला माझे नाव कसे माहित? याला मी पूर्वी कधी पाहिलेलं नाही!' असा विचार करीत तो त्यांच्याकडे गेला.
 
     ''बराच थकलेला दिसतोस ! बैस जरा. चिलीम पिऊन जा. काय रे, हे खोगीर कसे तुझ्याकडे?'' तो म्हणाला, ''माझी घोडी हरवली आहे. ती सापडण्याची आशा  उरलेली नाही ! सर्व जंगल धुंडाळले!'' बाबा म्हणाले, ''ते पलीकडे कुंपण आहे. तिथ जा. तुझी घोडी सापडेल.'' चांदभाई तेथे गेला. त्याची ती हरवलेली घोडी तेथेच चरत होती. ''या अल्ला, माझी घोडी सापडली.'' चांदभाईला आनंद झाला. ती घोडी घेऊन तो फकिराकडे आला. फकीर तंबाखू चुरीत होता. ''सापडली न घोडी! आता चिलीम ओढ!'' फकिराने चिलमीत तंबाखू भरली. ''पण ही पेटवणार कशी? इथे विस्तव कुठे आहे? शिवाय छापी भिजवायला पाणीही नाही.'' चांदभाई म्हणाला.
 
     फकिराने हातातील सटका जमिनीत खुपसताच आग उत्पन्न झाली. त्यातून रखरखीत निखारा बाहेर काढला. सटका जमिनीवर आपटताच त्यातून पाणी निघू लागले. छापी भिजवून ती पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. चिलमीतील तंबाखूवर तो प्रदीप्त निखारा ठेवला. फकिराने चिलीम स्वतः ओढून चांदभाईला ओढण्यास दिली. चांदभाई स्तिमित झाला. त्याने त्या फकिराच्या पायावर मस्तक ठेवले. 
 
     ''अल्ला मलिक !'' असे म्हणून बाबांनी चांदभाईला वर उठवले व ''अल्ला भला करेगा'' असा आशीर्वाद दिला. ''बाबा, तुम्ही माझ्या घरी चला !'' ''जरूर येईन मी !'' चांदभाई तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी तो फकीर धूपखेडे गावात गेला व चांदभाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. चांदभाई खुश झाला. फकिराचे त्याने आदराने स्वागत केले. उत्तम प्रकारे आतिथ्य केले. काही दिवस तो फकीर त्याच्याकडे राहिला. नंतर चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याची सोयरिक शिर्डीच्या एका मुलीशी झाली, तेव्हा तो फकीर चांदभाईच्या विनंतीला मान देऊन लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीस आला. वऱ्हाड घेऊन आलेल्या गाड्या खंडोबाच्या देवळापाशी असलेल्या मळ्यात थांबल्या. सर्वजण गाड्यातून उतरले. तो फकीरही उतरला व खंडोबाच्या देवळात गेला. तिथे म्हाळसापती खंडोबाचे भक्त पुढे आले व आदराने म्हणाले, ''या साई!'' तो तरुण फकीर म्हणजेच साईबाबा. 
 
     बाबा  शिर्डी येथेच राहत. शिर्डीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत. त्यांना कोणी त्यांच्याबद्दल विचारले असता, ''हम तो साई है, बहुत दूरसे आये है!'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय?'' यावर बाबा म्हणाले, ''मला साईबाबा म्हणतात.'' 
 
     बाबा कधी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत, तर कधी तिथल्या पडक्या मशिदीत जाऊन बसत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना व चार वर्णांना तिथे सर्वच द्वारे खुली असतात. त्या परम पवित्र मंगल स्थानाला तत्त्ववेत्ते विद्वान 'द्वारका' म्हणतात. साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत येत. 
 
     ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. तेथे शिरताना समोरची जी भिंत दिसते ती कृष्णाची. गोपालकृष्ण गोकुळात गोपालांसह काल्याचा आनंद उपभोगीत. बाबासुद्धा नाना प्रकारच्या जिनसा आणून त्या एकत्र करून एका मोठ्या हंडीत चांगल्या शिजवून आपल्या भक्तांना स्वतः वाटीत असत. एकदा चुलीजवळ शंभराहून अधिक माणसांना पुरेल इतकी मोठी हंडी शिजत होती. चुलीखाली लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आपल्या एका भक्ताला म्हणाले, ''अरे, बघत काय राहिलास? जरा ती हंडी ढवळ!'' तेव्हा तो भक्त उलथणे शोधू लागला. बाबा झटकन त्या हंडीकडे गेले व आपल्या कफनीच्या अस्तन्या वर करून आपला उजवा हात कोपरापर्यंत त्यांनी त्या हंडीत घातला व ते पदार्थ ढवळू लागले. बाबांच्या हाताला काही झाले नाही. बाबांचे जीवनकार्य हा एक चमत्कार होता.
 
     बाबांना दीपोत्सवाची मोठी हौस होती. बाबा टमरेल घेऊन दुकानदार वाण्यांकडे जात व त्यांच्याकडून तेल मागून आणत. पण त्यांना ते मनापासून देत नसत. बाबा ते तेल पणतीमधे भरी. चिंध्या काढून त्याच्या वाती वळीत. रात्री त्या मशिदीत पेटवित. त्या रात्रभर जळत असत. दिवाळीचा सण होता. बाबा नेहमीप्रमाणे सर्व दुकानदार वाण्यांकडे गेले. त्यांना कुणी तेल दिले नाही. ''आज तेल नाही. संपले.'' असेच त्यांना सर्वच दुकानदार वाण्यांनी सांगितले. बाबा निमूटपणे मशिदीत आले. आता हा फकीर मशिदीत कशा पणत्या पेटवतो हे पाहण्यासाठी ते सर्वजण मशिदीसमोर जमले. बाबांनी त्यात पाणी ओतले. आणि कांडे ओढून ते एक एक पणती पेटवू लागले. मशिदीत दीपमाळा उजळली. मजा पाहण्यासाठी आलेले दुकानदार बाबांच्या चरणी लीन झाले. 
 
     आजारी माणसे, रोगपीडित माणसे बाबांकडे येत. बाबा त्यांना वनस्पतींपासून स्वतः बनवलेली औषधे देऊन बरे करीत असत. जेव्हा जास्तच गर्दी वाढू लागली, तेव्हा बाबा औषधाऐवजी धुनीची उदी सर्वांना देऊ लागले आणि आलेले बरे होऊ लागले. भक्तांचे दुःख आणि दुखणे आपल्या अंगावर ओढून ते स्वतःच भोगीत असत. पुष्कळदा ते अनेक व्याधींनी जर्जर असत. भक्तांचे दुर्धर असाध्य रोग आपल्या अंगावर घेऊन ते भयंकर शारीरिक दुःख स्वतःच भोगीत. दाह व वेदना ते सहन करीत व भक्तांना वाचवीत. बाबा भक्तांना त्यांच्या स्वप्नात आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना उदी लावीत असत.
 
     बाबा भक्तांच्या संकटसमयी त्यांना सहाय्य आणि दिलासा देण्यासाठी दिशा आणि काळाची बंधने तोडून हजारो मैलांवर तत्क्षणी प्रकट होत. आपल्या असंख्य भक्तांना निरनिराळ्या रूपांनी प्रकट होऊन बाबांनी वाचविले आहे.      
    
     पुढे बाबा आजारी पडले. त्यांचे दुखणे प्रबळ झाले. भक्त तळमळू लागले. १५ ऑक्टोबर १९१८ हा दिवस उजाडला. त्या दिवशी विजयादशमी होती. बाबांची अवस्था कठीण होती. काही क्षणानंतर बाबांनी जवळच बसलेल्या बयाजी अप्पा कोते यांच्या अंगावर डोके टेकले. संपले सारे ! 
 
शिर्डीस ज्याचे लागतील पाय l
टळती अपाय सर्व त्याचे ll
माझ्या समाधीची पायरी चढेल
दुःख हे हरेल सर्व त्याचे ll 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा