गुरुवार, १६ जानेवारी, २०१४

श्री मोहटादेवी

श्री मोहटादेवी
पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे 9 कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री. क्षेत्र मोहटादेवीगड. येथील देवता श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई.

श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे ।। सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला ।।

वेद जाणु गेला पुढे मौनावाला ।। या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. ती आईच आहे हीच तिचीमहती.

श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः ।। श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तेच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता श्री नवनाथाना व तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे ।। या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली.

तिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले.

जनमानसातील विकाररुपी, मोहादि, राक्षसांचा वध करुन मोहात अडकवून स्धर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणासास जागे करुन दिव्य शक्ती, दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजु लागले उपासना करु लागले तस तशी त्याची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगु लागले. जीवनातील अगतीकथा, नैराश्य, दुःख दारिद्र्य, क्लेश, दैर्बल्यता, नि राष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ शक्तीसंपन्न बलवाण आहे.
असा आत्मविश्वासू माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला ही सारी किमया महती श्री मोहटादेवीचीच होय.

शरीराचे आणि मनाचिया रोग । न होतीहे भोग प्रारब्धाते ।।

रोगीट शरीर व मन हे आपल्याच कर्मचे फळ आहे. तो रोग आपणच नाहीसा केला पाहीजे हा प्रेष माणसास मिळू लागला. मनातील विकल्प जाऊन सत्यसंकल्पत्व प्राप्त होऊ लागले. आत्वल क्षीण झाले. नाहीसे झाले की, नाना व्याथी मनास ग्रासुन टोकतात व मनुष्यजीवंत असूनही जीवंतपणाची अनुभुती येत नाही ही अवस्था नष्ट होऊन आत्मबल प्राप्त होऊनजगत असताना जीवानंद मिळण्यासाठी प्रत्येक क्षणीशक्ती प्राप्त होते हाच श्री मोहटादेवीच्या कृपेचा नित्य अनुभव, साक्षात्कार, चमत्कार व हीच महती होय.

अनेक भक्तगणांना दृश्य स्वरुपात साक्षात्कार येऊ लागला व श्रीमोहटादेवीची महती गवोगावी पसरु लागली. श्री मोहटादेवीच्या स्वरुपाकडे पाहीले की, कितीही दुःखी असणारे मन हे प्रसन्न होते हीच पहीली अनुभूती.

म्हशीचा रंग बदलला :-

नित्य श्री मोहटादेवीची ना येथे जाऊन तीर्थ घ्यावे श्री भगवान सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे व श्री मोहटादेवीचे दर्शन घेऊन दिवसभर सदाचार संपन्नतेने राहुन सासंसरीक कर्म करावा असा दिनक्रम असताना प्रसंग असा की, एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा चुकारीच्या म्हशी आल्या. चुकारीच्या आलेल्या म्हशी सांभाळून ज्यांच्या असतील ते म्हशचीचे मालक आल्यावर त्यांना देऊ अशीच त्याची इच्छा ईश्वरी लीला व वेगळीच असते. अनेक दिवस वाटपाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांचे नाकेदार यांना कळाले व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला आणि पाचारण करुन बंदिस्त करण्याच आदेश केला. बिचार्या भक्तास खुप दुःख झाले दुःखातून मुक्त होण्यासाठी श्री मोहटादेवीची आळवणी केली. खडा पहारा केला उपवास केला व नवस केला आई यापुढे आम्ही गायी म्हशीचे दुध तुप विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणार देखील नाही. परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहुन आई व श्री मोहटादेवीची कृपा झाली. ईश्वराजवळ कर्तुम, अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती असते. भक्तांचे कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे याप्रमाणे भक्त साहसी व्हावा, बलवाण व्हावा म्हणूनच भगवान प्रसंग ऊभा करत असतो व त्याचे निवारण ही करतो. दुसर्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतुन म्हशीचा काळा रंग बदलून भोरा (पांढरट) झाला. काल पाहीलेल्या ह्या म्हशी नाहीत बंदिस्ताचा हुकुम रद्द केला. ही सर्व श्री मोहटादेवीची लीला आहे असे वर्णन सर्वांनी केले नाकेदारासह भक्तांनी श्री मोहटादेवीचे दर्शन घेतले. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दुध तुप विकत नाहीत व देवीस अर्पण केल्याशिवाय कात नाहीत. बादशहाच्याही कानी ही वार्ता नाकेदाराकडून कळली उपासना भाग; भिन्न असल्यातरी तत्व एकच आहे. शक्ती एकच आहे. नीतिमत्ता, ही सर्व धर्माचीच शिकवण आहे आणि यातील कार्य करणारी शक्ती म्हणजेच श्री जगदंबा देवी आहे. भेदाभेद सर्व अमंगल ।। अशी बादशहाची वृत्ती पालटली व भ्रम दुर झाला नाकेदारास बढती देऊन श्री मोहटादेवीस विपूल द्रव्यदान दिले सर्वजन आनंदाने श्री मोहटादेवीची महती गाऊ लागले. ही वार्ता सर्वदूरजाऊन देवीची प्रसिद्धी होऊ लागली.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी विश्वासपुर्वक बलयुक्त लोकमान्यटिळकांची प्रतिज्ञा व हजारे महान असे बळवीर म.गांधी, विं.दा. सावरकर, मंगल पांडे, भगतसिंग आहे. स्वातंत्र्यासाठी जीवापाड संघर्ष करत होते. श्री. समर्थ रामदास स्वामी, श्री. संत तुकाराम महाराजादि संत महात्म्ये जन जागृती करत होते काळामध्ये मनुष्यास स्वधर्माचे विस्मरण होत चालले होते. मोह पाशात अडकून मनुष्य पारतंत्र्यास जणू स्वातंत्र्य मानू लागला होता.

या मोहग्रस्त बिकट काळामध्ये, दंडकारण्यप्रदेशी श्री भगवान नवनाथादि संत महात्म्यांच्या पुण्यपावण प्रदेशी श्री छत्रपती शिवरायांना स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे खंबीर बलाढ्य कर्तव्यदक्ष शुरवीरंच्या क्षेत्री, गोदावरी सारख्या पुण्यनदीच्या परीसरात शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराजांच्या कृपा छायेमध्ये श्री भगवान वृद्धेश्वर, श्री भगवान मच्छिंद्रनाथ , श्री भगवान कानीफनाथ, श्री भगवान गहिनीनाथ, श्री भगवान जालींदरनाथ, श्री. भगवान नागनाथ यांचे कृपाछत्र आहे. अशा प्रदेशात मनुष्य मोहग्रस्त झाला तर स्वप्रगती, राष्टोद्धार, आत्मोन्नती, जीवनानंद संपुण जाईल व मोठा विनाश ओढवेल. जन्मास येण्याची ही योग्य वेळ योग्य स्थळ आहे श्री क्षेत्र माहुरगडवासिनी आई रेणुकामातेने जाणले आणि लेकरांसाठी श्री मोहटादेवीच्या रुपाने अवतिर्ण झाली.

भाविक भक्तांनो,

मोहटागाव व परिसरातील लोक श्री माहुरगड निवासिनी रेणुकामातेची भक्ती निष्ठापुर्वक करत असत. त्या काळामध्ये माहुरला जाण्यासाठी पायी मार्गच असे. पायी दिंडी यात्रा निघायची. साहित्यासाठी बैलगाडी असायची. दररोज पहाटेच उठावे. भूपाळी भावगीत प्रार्थना म्हणावी. सुर्यनमस्कार, व्यायाम, ध्यान, धारणा करावी. स्नान करुन श्री रेणुकामातेची पुजा करावी. नित्य सदाचाराने संस्कृती संपन्न जीवन जगावे व लहानांना आचरणातून धर्म शिकवावा. असाच त्यांचा नित्यनेम. मोहटागावापासून माहुरगडहुन परत गांवी येण्यास जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागायचा. आईचे आशिर्वाद घेऊन पुन्हा आपल्या गावी येऊन व्यवसाय करावा.

आधि प्रपंच करावा नेटका मग परमार्थ सुभटा या श्री समर्थ उक्तीनुसार धन्य तो ग्रहस्थाश्रमः या न्यायाने संसार करावा. संसार सोडून परमार्थ केला अन्न मिळेना खायला अहो कैसा करंट्याला परमार्थ कैसा अशी संसाराची विफलता होणार नाही याची काळजी घ्यावी व जीवनाला परम अर्थ प्राप्त व्हावा असे वागावे असे ते देविभक्त

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।

अशा पद्धतीने धनाचा विनियोग करणारी ती माणस. त्यामुळे त्यांच्याजवळ दैवीगुण संपत्ती टिकुन होती. तर दुसरीकडे समाजामध्ये इंग्रजी वाढती सभ्यतेच्या व मोगलराजवटीच्या मनुष्य अडकू लागला व मोहरुपी पाशांत बांधला जाऊ लागला व भिकाररुपी राक्षसी वृत्ती वाढू लागली.
संमोहात विभ्रमः ।। या मोहादि विकारामुळे बुद्धी मालिन्य, अस्थिरपणा, उदासमनोवृत्ती, निष्क्रियता, आत्मवंचकता अगतिका आदि दुर्गुण व दुरावस्था प्राप्त होते व विनाशाकडे मनुष्य जाऊ लागतो. म्हणूनचा श्री भगवती श्री भगती रेणुकामातेने श्री मोहटादेवीच्या रुपाने अवतार धारण करुन या विकाररुपी मोहरुपी राक्षसाचा वध करुन समाजास दिव्यदृष्टी शक्ती, बुद्धि देण्याचे कार्य केले.

अनेक वर्ष वारी करणारे मोहटागाव व परीसरातील भक्त गणामधील हरी गोपाल, बन्सी दहिफळे या वृद्ध भक्ताने आर्ततेने देवीची प्रार्थना केली. आई शरीर थकले आहे. पायी वा बैलगाडीतून देखील तुझ्या भेटीला येणे शक्य वाटत नाही. तुझा वियोग तर असाह्य होतो. आई तु आम्हास सोडू नको आई, आई असे म्हणून डोळे भरुन आले. तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झाले व मौनेची करावा नमस्कार दोन्ही हात तिसरे मस्तक यांनी साष्टांग नमस्कार केला.

देव भावाचा मुकेला हाचि दुष्काळ तयाला ।।

भक्त मंडळी शांत झोपी गेली. पहाटेच्या सुमारास भक्तांस दृष्टांत झाला. बाळा, ती तुझ्या बरोबरच आहे. घाबरुन नकोस. विश्वास ठेव मी सर्वत्र आहे. हे शब्द जाग आली तर समोर कुणीच नाही. पुन्हा तोच आवाज तेच शब्द.

दुसर्या दिवशी पुन्हा दृष्टांत व शब्द ध्वनी ऐकताच दिव्य मुर्ती समोर सारया भक्तांचे डोळे दिपले. भव्य प्रकाश साध्या डोळ्यांना पाहावत नव्हता पुन्हा तोच ध्वनी कानांवर. भक्तांचे देहभान हरपले. भावसमाधीतून भानावर आले व सर्वांना महान असा आनंद झाला. व जीवनात नवचैतन्य निर्माण झाले. नामस्मरण करीत मोहटागाव जवळ करु लागले व आई कुठे पुन्हा भेट देईल या क्षणाची स्थळाची वाट पाहु लागले.

भक्तांच्या बरोबर दैवीगुणसंपन्न अशी एक पांढरी शुभ्र नित्यदुध देणारी गाय होती. ती गाय अचानक धावत निघाली ती पुन्हा शोध घेऊनही सापडलीच नाही. यात्रा मुक्काम करीत, दिनक्रमाने नित्योपासना करीत चालू होती. एक दिवस यात्रेतील भक्तांनी बाबांना विचारले बाबा, देवी आपल्याबरोबर आहे मग दिसत का नाही, बोलत का नाही. बाबांनी उपदेश केला, अरे वेड्या कलियुगात भगवंताने मौन धरले, बैद्ध अवतार धारण करुन विटेवर उभा राहुन तो दिव्य शक्तीने भक्तांचे पालन पोषण करतो.

केवळ दिसते तेच सत्य असते काय ? हवा दिसत नाही मग हवा नाही काय ? सुगंध दिसत नाही मग नाही का ? पहाणे हा डोळ्याचा विषय, वास घेणे हा नाकाचा विषय ? नाक दाबले की हवेची सुगंधाची, दुर्गधाची इनुभुती येते व हवा आहे सुगंध आहे हे कळते. साध्या डोळ्यास जे दिसत नाही त्यासाठी भिंगाचा उपयोग करतात.
तसा देव हा अनुभवाचा विषय आहे व तो पाहण्यासाठी दिव्यदृष्टी लागते. दुर्लभ असे वाघीणीचे दुध प्राप्त झाले तर घेण्यासाठी सोन्याचे भांडे लागते. तसा भक्तांच्या ठिकाणी अंतःकऱणाचे योग्य पात्र झाले की, मनुष्य ओळखू येतो, त्यानंतर साधु ओळखता येतो व मग देव कळतो.

मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य़देवोभव, अतिथिदेवोभव ह्या पायरया चढल्या की मंदिरातील आईचे दर्शन होते असा उपदेश केला नित्य कथा, कीर्तन, नृत्य, गीत गायन करती यात्रा मोहटागावी पाहोचली. पुन्हा पहाटे तोच दृष्टांत तो ध्वनी आवाज बाळा, अरे तुमच्या बरोबरच गावी आले.

सकाळी गुराखी मुलांनी गुरे सोडली व वनात चरण्यास घेऊन गेली तर उंच डोंगराच्या पायथ्याशी एक तेजसंपन्न सुंदर स्त्री दिसली मुले जवळ जातात तो ती गुप्त झाली. मुले भयभयीत झाली. काहीमुले उंच डोंगरावर गेली तर त्यांना यात्रेतून पळून गेलेली पांढरीशुभ्र गाय पहावयास मिळाली. ही वार्ता मुलांनी गावात येऊन सांगितली. श्री. भगवान सिद्धेश्वरनजीक गावालगत ओढा असून त्या ठिकाणी एक ढोह आहे. सुंदर तेजपुंज स्त्री स्नान करीत आहे. असे पहाटच्यावेळी पाणी आणण्यासाठी गेलेल्या काहीसुवसिंनी स्त्रिया यांना दिसून आले. आजी, कुठल्या तुम्ही ? अग मी याच गावची आहे. तुमच्यासाठीच मी इथे रहाते; असे सांगितले आणि पहाता पहाता ती म्हतारी गुप्त झाली. ही वार्ता संपुर्ण गावात कळाली जो तो विचार करु लागला. सारा गावा श्री सिध्देश्वराजवळ जमला. देवीची प्रार्थना करु लागला. दहिफळे बाबांना भावसमाधी लागली. एवढ्यात कानांवर पुन्हा आवाज माझ्या पाडसांनो, मी तुमच्यासाठी माहुरगडांवरुन आले. उंच डोंगरावरुन गाईने हंबरडा फोडला. सारा गाव धावत धावत आई श्री. रेणुकामातेची गर्जना करीत करीत उंच डोंगरावर पोहचला आणि पाहतात तो जिथे गाय उभी त्याच ठिकाणी भव्य, दिव्य तेजपुंज असा शेंदराचा तांदळा. श्री भगवान परशुरामांसाठी जशी माहुरगडांवर श्री रेणुकामाता प्रगट झाली तशी मोहटा गावच्या परशुरामासाठी आई श्री रेणुकामाता प्रगट झाली. सर्वभक्तगणांचे मन आनंदाने भरभरुन आले. गाय नाचे उडे आपुलीया छंदे । आनंदू रे आजि आनंदुरे । अशी अवस्था झाली सर्वजन आनंदोत्सव साजरा करु लागले व श्री मोहटा देवीचे दर्शन करु लागले एवढ्यात झोपेतून कुणी हालवून जागे करावे तसा आवाज आला, अरे उठ जागा हो, विकाररुपी राक्षसाचा वध करुन स्वधर्म संस्थापनेसाठी मी येथे प्रगट झाले, सर्व जण सर्व इंद्रियांचे कान करुन तो आवाज ऐकत होते व श्री मोहटादेवीकडे टक लावून पहात होते. पुन्हा तोच तोच आवाज ऐकु यायचा सर्वांना महत आश्चर्य़ वाटले दिव्यशक्तीची अनुभूती आली आणि सर्वभक्तागणांनी साष्टांग दंडवत घेतले व आइची प्रार्थना केली आई ग आम्हांस सांभाळ.
तो पुण्य पावन दिन म्हणजे आश्वीन शु. 11 म्हणुनच या दिवशी लाखोंच्या संख्येने भावीक श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर येतात व आनंदोत्सव साजरा करुन श्री मोहटादेवीचे दर्शन घेतात.

ती प्रथम मोहाच्या झाडाखाली दिसली म्हणुन मोहस्थिमाता, उंच डोंगरावर प्रगट झाली तिच जागृत, स्वयंभू, नवसासपावणारी, विकारुपी मोहरुपी वध करणारी, त्रिगुणात्मिका, श्री क्षेत्र माहुरगड निवासिनी श्री रेणुकामाता प्रगट झाली तिच मोहटाग्राम निवासीनी श्री मोहटादेवी होय. तिच्याच नांवे श्री क्षेत्र मोहटादेवी गडाची स्थापना झाली व प्रसिद्धी झाली.

या दिव्यांनंदामुळे मोहटागांव व परिसरातील भावीक भक्तांनी भक्तांच्या सोयीसाठी, नित्योपासना पुजा अर्चादी विधीसाठी भव्य, दिव्य, कलासंपन्न असे दगडी मंदीर उभारणीचा संकल्प केला आणि मंदीर शिखरासहीत श्री मोहटादेवीच्या कृपेने पूर्ण झाले.

उपासना भक्ती पूजामद्ये ध्यानमग्न असणार्या भावीक भक्तांना श्री मोहटादेवीचा साक्षात्कार होऊ लागला, कृपेची नित्य अनुभूती येऊ लागली व मोहटागांव व परिसरामध्ये गांवोगांवी ही वार्ता पसरु लागली आणि भावीकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. नवसाच्या माध्यमाने द्रव्य रुपात, वस्तु, धान्य स्वरुपात देणगी जमा होऊ लागली व ग्रामस्थांनी भव्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मानवी जीवनामध्ये इतर व्यक्तीकडून एखादे काम झाले मदत झाली तर कृतज्ञता म्हणून मनुष्य उपकाराची वाहवा करतो, सामाजीक उद्धार, राष्ट्रोद्धार कार्य झाले मनुष्य अशा महान राष्ट्रोद्धार करणार्या व्यक्तींचा जयजयकार करतो

ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्ववंवदेया आत्मारुपा । माऊली ज्ञानदेवाने नमन करुन स्वंवेद्य आत्मरुपाचा जयजयकार केला व हृदयमंदिरात पूजा केली. यानुसारच दिव्यांनंदाने भक्तगणांनी मंदीर उभारणीचे कार्य सुरु केले व दिसेल ते काम करु लागले.

गडावर येण्यास निकटमार्ग. निश्चयात्मक श्रद्धायुक्त अंतःकरण असल्याने महत कष्टाने खाणीद्वारे मोठ मोठे दगड माढून, उत्तम कलासंपन्न दगडी खांब, चीरे कमान, इ. निर्माण करुन चार चौघांनी एकत्र येऊन खांद्यावर घेऊन गडावरती आणले. उत्तम कारागीराकडून काम सुरु झाले. आणि पाहता पाहता दीपमाळ, सभामंडप, प्रवेशद्वार, यासह मंदिराची ऊभारणी होऊन विविध देवदेवता, साधसंत यांच्या मुर्तीसह उंच असे शिखरासह मंदिराचे बांधकाम श्री. मोहटादेवीच्याच कृपाशिर्वादाने पूर्ण झाले.

श्री भगवान जगदगुरु ज्योषपीठाचार्य 1008 श्री शंकराचार्य़ महाराज यांच्या परमपावन शुभहस्ते अनेक साधुसंत महात्म्याच्या उपस्थितीत अध्यक्षांसह व्यवस्थापन समिती, कर्मचारी वृंद व ग्रामस्थ, हजारो भावीक भक्तांच्या मेळाव्यामध्ये शास्त्रविधीवत कलशारोहन कार्यक्रम श्री मोहटादेवीनेच करुन घेतला.
सौजन्य - http://www.shrimohatadevi.org/

रविवार, ११ ऑगस्ट, २०१३

व्यंकटेश बालाजी देवस्थान देवराई

  भाविकांचे श्रद्धास्थान देवराई येथील  व्यंकटेश बालाजी देवस्थान 

पाथर्डी तालुक्यातील  देवराई येथील ग्रामदैवत असलेल्या व्यंकटेश बालाजी  हे जिल्ह्यातील नाथ परंपरेतील प्राचीन व धार्मिक वारसा लाभलेलं एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते .या देवस्थानला पूर्वी ग्वाल्हेरच्या तत्कालीन राजाकडून सनद पुरवली जात होती
सुमारे २००० वर्षाचे हे प्रचींन मंदिर हेमाडपंथी स्वरुपात उभे होते. आता मात्र येथे मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. याच मंदिराजवळ ऎतिहसिक बारव आहे. श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते . या  वेळी राज्यभरातून मोठ्या  संख्येने भाविक येथे येतात .तसेच गोकुळाष्टमी निमीत्त येथे धार्मिक कार्यकामचे आयोजन केले जाते . देवराई गावाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. गावापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे मच्छिंद्रनाथाल व गोरक्षनाथ यांनी सोमयाग यज्ञ घातला. यावेळी सर्व देव देवतांना आमंत्रित करून महाप्रसादाचे आयोजन केले .त्यावेळी उपस्थित देव देवतांनी भोजनासाठी जेथ पयंत रांगा लावल्या ते ठिकाण म्हणजे देवराई अशी या गावाची ओळख आहे. यज्ञ सांगतेनंतर उपस्थित देव देवतांना सन्मानित करून धन धान्य सुवर्णमुद्रा व अलंकार देऊन स्वगृही पाठविण्यात आले. 
    उर्वरित संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी  भगवान विष्णू अर्थात व्यंकटेश बालाजीवर टाकून भगवान आदिनाथ वृद्ध रुपात येथेच थांबले तेच हे प्रसिद्ध ठिकाण  श्री क्षेत्र वृध्देश्वर म्हणून ओळखले जाते. म्हणून  धन धान्य पैसा  आदीचे रक्षण व्यंकटेश बालाजी करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री क्षेत्र वृध्देश्वरला व मढी ला दूरवरून दर्शनासाठी येणारा भाविक प्रथम देवराई येथे व्यंकटेश बालाजी चे दर्शन घेऊन पुढे जातो. 


मंदिराचा जीर्णोद्धर :-
सन २००९-२०१० या कालावधीत  मंदिराचे नवीन बांधकाम करण्यात आले असून खासदार दिलीप गांधी याच्या निधीतून सभामंडप तर ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने मंदिरचे काम चालू आहे . दोन वर्षापूर्वी राजस्थान येथून आणलेली काळ्या स्फटिकाची आकर्षक बालाजीची मूर्ती विधिवत बसविण्यात आली आहे मंदिराचे शिखर व गाभारा व सभामंडप अशी आकर्षक स्वरुपाची कामे करण्यात आली आहे. 

 इतर पूर्ण झालेली कामे    :-

  1. संकटमोचन हनुमान मंदिर :- हनुमानच्या मूर्तीची स्थापना रामदास स्वामीनी केलेली आहे. ही मूर्ती दक्षिण मुखी असून तेलाची आहे. २००८ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. 
  2. रेणुका माता मंदिर :- रेणुका माता देवीचा आकर्षक  अशा तांदळा आहे. तसेच शिखराचे सुंदर असे काम नांदेड येथील कारागिराने पूर्ण केले असून मंदिराचे आतील संपूर्ण काम देवराई येथील भक्ताने पूर्ण केले आहे. 
  3. जि. प. सदस्य अर्जुनराव शिरसाठ  यांच्या निधीतून पथदिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
  4. देवराई ग्रामपंचायतने मंदिर परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रेटचे काम पूर्ण केले.              
             यात्रा उत्सवतील  विविध कार्यक्रम
  येथील बालाजीची यात्रा ऑगस्ट महिन्यात असते. बालाजीला पैठण वरून आणलेल्या कावडीच्या पाण्याने रात्री १२ वाजता म्हणजे  गोकुळाष्टमी  च्या दिवशी  जलाभिषेक घातला जातो. याच दिवशी भाविकांनी आणलेल्या कवडीची मिरवणूक काढली जाते यावेळी फटक्याची आतिषबाजी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माची पोथी वाचली जाते . तसेच बालाजी सार्वजनिक ट्रस्ट कडून विद्ययुत रोषणाई केली जाते .

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

हरिश्चंद्रगड



हा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत.
खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. राष्ट्रीय महामार्ग २२२ असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावरखुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे.
पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्‍या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.
येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.
येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.
गणपती,हरिश्चंद्रेश्वर मंदिर
मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.
Harishchandragad04.jpg (512×344)
कोंकणकडा
हरिश्चंद्रगडाचे सर्वांत जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.
हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा,जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड,भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.
गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.
१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली
मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.
'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा ।
मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥
हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
सुरसिध्द गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥
मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥
जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.
कोकणकडा
या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु 'U' आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो.

चांदबिबीचा महाल




अहमदनगर हे अहमदशाह बादशहाने वसविलेले नगर. त्याला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. तो चांदबिबीचा म्हणून ओळखला जात असला, तरी तो मूळचा सलाबतखानाचा महाल आहे.

सलाबतखान हा निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह याचा मंत्री होता. त्याचे मूळ नाव शाह कुली. सलाबतखान ही निजामाने त्याला दिलेली पदवी. त्याने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.

अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी. नगर हा पठारी प्रदेश. लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा. त्यामुळे येथे राजधानी उभारण्यात आली. शहराच्या संरक्षणासाठी आजूबाजूला अनेक बांधकामे उभारण्यात आली. त्यातीलच एक म्हणजे हा महाल असे मानण्यात येते. हा महाल अशा ठिकाणी आहे, की जेथून अहमदनगरकडे चाल करून येणारी फौज सहज दिसू शकते. या महालाचे दुसरे नाव दुर्बिण महाल असेही आहे, हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे. 
काहींच्या मते ही सलाबतखानाची आराम फर्मावण्याची जागा होती. दौलताबाद हा सलाबतखानाचा आवडता किल्ला. त्याचे सतत दर्शन व्हावे या हेतूने या महालाची उंची वाढविण्याचा त्याचा इरादा होता. पण तत्पूर्वीच (१६१९?) त्याचे तळेगाव-दाभाडे येथे निधन झाले. मोगल परंपरेनुसार या महालात, तळघरामध्ये सलाबतखानाने आपल्या कबरीची व्यवस्था आधीच केली होती. त्याप्रमाणे तेथे तो व त्याची पत्नी चीरनिद्रा घेत आहेत. त्या दोघांच्या कबरी तेथे आहेत. शिवाय तळघरातच, जरा बाहेरच्या बाजूला त्याची दुसरी पत्नी, मुलगा आणि एका कुत्र्याची कबर आहे. 

अहमदनगर हे अहमदशाह बादशहाने वसविलेले नगर. त्या नगराला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी एक अष्टकोनी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. इमारतीच्या भिंतींना तिरप्या फटी असल्याने दिवसभर या इमारतीत सूर्याची किरणे पोचतात. सलाबतखाने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.
लोक गैरसमजुतीने या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ही दुसर्‍या सलाबतखानाची कबर आहे. हा सलाबतखान हा इसवी सनाच्या १५५५ मध्ये गादीवर आलेला चौथा निजाम, मूर्तजा याचा वजीर होता. वेडसर मूर्तजाने त्याच्या चंगीजखान या वजिराला संशयावरून मृत्युदंड दिला, आणि त्याच्या जागी १५७९ मध्ये सलाबतखानची नेमणूक केली होती.
सलाबतखान हा अहमदनगरमध्ये तेथील लोकांना आवडत असे.

भुईकोट किल्ला



आदिलशाही, कुतूबशाही, हैद्राबादची निजामशाही आदीविरुद्ध बहामनी सेनेचं आक्रमण थोपविण्याची जबाबदारी अहमद निजामशहावर पडल्यानंतर आपल्या अतुलनीय शौर्यानं ज्या ठिकाणी बहामनी सेनेला धूळ चारून विजय मिळविला तो गर्भगिरी पर्वत रांगांलगतचा हा निसर्गरम्य प्रदेश.
नगरच्या भुईकोट किल्ल्याला प्राप्त झालेलं सामरिक महत्त्व तेव्हापासून आजतागायत टिकून आहे. एक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी. टेकडय़ांमुळे बुरुजांवर तोफा डागणं अशक्य त्यामुळे किल्ल्याची अभेद्यता वाढली. वर्तुळाकार असलेल्या किल्ल्याला २२ बुरूज आहेत. अहमद निजामशहानं आपल्या कर्तबगार, मुत्सद्दी प्रधान, सेनापती आदींची नावं बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. तटबंदीच्या आतील बाजूस एकूण सहा राजमहाल होते.सोनमहल, मुल्क आबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल, अशी त्यांची नावं. इमारतींच्या मध्यभागी एक मदरसाही बांधला होता. या मदरशातच राजघराण्यातील मुलांचं शिक्षण होत असे. दिलकशाद, हबशीखाने अशा इतर वास्तूंची निर्मिती गरजेप्रमाणे होत गेली. छोटेखानी गावच किल्ल्याच्या तटबंदीआड वसलं होतं. या साऱ्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चार मोठय़ा विहिरीही खोदण्यात आल्या. गंगा, यमुना, मछलीबाई, शक्करबाई अशी त्यांची नावं होती. आता या विहिरींचं आणि महालांचं अस्तित्व दिसत नाही. ‘कोटबाग निजाम’ आणि आसपासच्या इतर देखण्या वास्तूंमुळे येथे वैभवशाली नगरी वसली. त्या काळी या नगरीची तुलना बगदाद, कैरोसारख्या तत्कालीन सुंदर नगरांशी झाल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. निजामशाही, मोगलाई, पेशवाई, ब्रिटिश अशा अनेक राजवटी या किल्ल्यानं अनुभवल्या. राजवटीनुरूप या वास्तूच्या जडणघडणीतही बदल घडले. निजामांनी किल्ल्यात वास्तव्य केले. मोगलांनी किल्ल्याचा सामरिक वापर केला. तर ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर कारागृह आणि दारूगोळा निर्मिती केंद्र म्हणून केला.

एक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी आहे.

इतिहासातील अनेक कडूगोड स्मृती ‘कोटबाग निजाम’ने आपल्या उदरात सामावून ठेवल्या आहेत. कधी या किल्ल्याने तत्कालीन परदेशी मुस्लिमांच्या शिरकाणाने प्रचंड नरसंहार अनुभवला. तर कधी फंदफितुरीची अनेक कारस्थानं इथंच शिजली. अनेकदा भाऊबंदकीची नाटय़ं घडली. अनेकदा शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने अनुभवले. कित्येकदा किल्ल्याला वेढा पडून तहाचे प्रसंग उठवले. जिथे सुलताना चाँदच्या शौर्याचा दिमाख इथल्या शिळांनी अनुभवला तिथेच चाँदच्या भीषण हत्येचा साक्षीदार याच पाषाणचिरांना व्हावं लागलं. मोगलांनी किल्ला सर करण्यासाठी जंगजंग पछाडलं, तर पेशव्यांनी बंदुकीची गोळीही न उडविता मुत्सुद्देगिरीने किल्ला काबीज केला. किल्ल्यासाठी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.
िहदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याचे सामरिकदृष्टय़ा असलेलं महत्त्व ते जाणून होते. त्याहीपेक्षा आपल्या वाडवडिलांची कर्मभूमी असल्याने हा किल्ला आपल्या अमलाखाली असावा, असं शिवाजी महाराजांना नेहमी वाटत असे. महाराजांच्या सैन्यानं हा प्रांत तीन वेळा लुटला यावरून इथल्या सुबत्तेची कल्पना येते. मोगलांचा किल्लेदार मुफलत खान याने सर्व संपत्ती किल्ल्यात आणून ठेवल्याने मराठी सैन्याच्या हाती फारसं काही लागलं नाही. किल्लाजिंकणं ही शिवाजी महाराजांची मनीषाही अपूर्णच राहिली.
सुलताना चाँदच्या हत्येनंतर सन १६०० मध्ये पहिल्यांदा हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. पुढे मोघलांचा सरदार कवी जंग याला वैयक्तिक जहागिरी बहाल करून पेशव्यांनी कोणत्याही रक्तपाताविना, मुत्सुद्देगिरीनं हा किल्ला पेशवाईच्या अमलखाली आणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. कालांतराने ब्रिटिशांनी पेशव्यांकडून हा किल्ला हस्तगत केला. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती जनरल ऑर्थर वेलस्ली याने खंदकाशेजारील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत.
सन १७६७ मध्ये सदाशिवभाऊ (तोतया), १७७६मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते यांना येथे कैदेत ठेवण्यात आले होते. राघोबादादांचे अधिकारी चिंतो विठ्ठल रायरीकर, नाना फडणविस, मोरोबा दादा, िशद्यांचे दिवाण बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भागिरथीबाई िशदे यांना याच किल्ल्यात तुरुंगवास घडला. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी जर्मन कैद्यांनाही याच किल्ल्यात ठेवलं होतं.
इंग्रज राजवटीच्या विरोधात चलेजाव आंदोलनाचं लोण १९४२ साली देशभर पसरल्यानंतर आंदोलनाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोिवद वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, डॉ. सय्यद महेबुब, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, अरुणा असफअली, डॉ. पी. सी. भोज, आचार्य शंकरराव देव आदी नेत्यांना या किल्ल्यात डांबण्यात आले होते. बंदिवासात असताना पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. अबु कलाम आझाद यांनी ‘गुबारे खातीर’ या ग्रंथाचे लेखन याच किल्ल्यात केले. चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यूही याच किल्ल्यात झाला. ब्रिटिशांच्या काळात किल्ल्यात बरेच बदल झाले. किल्ल्याच्या पूर्वेला असलेला झुलता पूल १९३२ साली ब्रिटिशांनी बांधला. काडतुसे निर्मितीची प्रयोगशाळा किल्ल्यात उभारली. तिला रॉकेटरूम म्हटलं जायचं.
भारतीय स्वातंत्र्याच प्रतीक म्हणून १५ ऑगस्ट १९४७ साली दिल्लीत झेंडावंदन सुरू असतानाच या किल्ल्यावरील ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ उतरविण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी सोहळा याच किल्ल्यात पार पडला. भारतीय स्वातंत्र्यानंतर या किल्ल्याचं महत्त्वं जरी वाढलं तरी हा किल्ला लष्करी हद्दीत असल्यानं तिथे लष्करी कार्यालय सुरू करण्यात आलं. तेव्हापासूनच पुरातत्व खात्याचं या किल्ल्याकडे दुर्लक्ष झालं. खंदकात प्रचंड झाडी वाढली, इलाही बुरुजाकडे जाणारा पूल कोसळला. दगडी तटबंदीतून झुडपं वाढल्याने किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास योजनेत किल्ल्याचा समावेश झाल्याने किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. किल्ल्याभोवतालच्या संरक्षक िभती व कठडय़ाच काम पूर्ण झालेलं असून परिसरातील नियोजित नेहरू उद्यानाचे भूमिपजून किल्ला महोत्सवदिनी राज्यपाल के. शंकरनारायणन्, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आलं. नेहरू उद्यान लवकरच आकार घेईल, त्याचबरोबर किल्ल्याच्या आत संग्रहालय, ग्रंथालय, कलादालन, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, माहितीपुस्तिका आदी सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी शासनाने ५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. किल्ल्याच्या तटबंदीजवळ खंदकात नौकानयन, सायंकाळी लेझर-शो आदी योजनाही कार्यान्वित होतील. किल्ल्यात घडलेल्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित ‘ध्वनिप्रकाश’ योजनेच्या सहाय्यानं माहिती देण्यासाठी संहितालेखन सुरू आहे.
यंदा पहिल्यांदाच किल्ला महोत्सव साजरा करण्यात आला. या पर्यटनस्थळाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या महानायिकांच्या बहारदार कार्यक्रमाबरोबरच शोभेच्या दारूची आतषबाजीही करण्यात आली. लवकरच ५२१ वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारा ‘कोटबाग निजाम’ ‘भुईकोट किल्ला’ आपल्यातील जुनेपण जपत, नवा साज लेवून पर्यटकांशी संवाद साधेल.


अहमदनगर शहराला माझी तशी पहिलीच भेट. राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला हा जिल्हा कसा असेल याचा विचार मनात सुरु होता. वेळ कमी असल्याने मी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट द्यायचे ठरवले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका कार्यालयाला भेट दिल्यानंतर मी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या दिशेने निघालो. हा किल्ला कसा असेल, त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, किल्ल्याची अवस्था आता कशी असेल असे असंख्य प्रश्न मनात येत होते.

किल्ल्याजवळ पोहचताच किल्याजवळील विकास कामे पाहून आनंद झाला. या किल्ल्याचे रुपांतर राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन केंद्रात करण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांनी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती मिळाली. किल्ल्यात प्रवेश करताच इतिहासातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. स्वातंत्र्यलढयातील अनेक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनातील पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत, पंडित हरेकृष्ण मेहताब, आचार्य जे.बी. कृपलानी, डॉ. सय्यद महसूद, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, बॅ असफ अली, डॉ. पी. सी. घोष, शंकरराव देव, आचार्य नरेंद्र देव अशा १२ राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. स्थानबध्दतेच्या या काळात पंडित नेहरुंनी केलेला पत्रव्यवहार, त्यांच्याच हस्ताक्षरातील पत्रे येथे जतन करुन ठेवली आहेत. ती वाचतांना नेहरुजींचे सुंदर हस्ताक्षर, त्यांचे विचार, त्याचे हिंदी बरोबरच इंग्रजी आणि उर्दू भाषेतील प्रभुत्व पाहून अभिमान वाटतो. 

चले जाव आंदोलनातील या सर्व नेत्यांना ज्या खोल्यांमध्ये स्थानबध्द करुन ठेवले होते त्या खोल्यांमध्ये गेल्यानंतर या नेत्यांची माहिती छायाचित्रांसह पाहिल्यावर, वाचल्यावर त्यांच्या उत्कट देशप्रेमाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या किल्ल्यातील स्थानबध्दतेच्या काळात अवघ्या ५ `महिन्यात` `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता.

किल्ल्यात पंडित नेहरुंना स्थानबध्द केलेल्या खोलीत एक कॉफीटेबल बुक ठेवले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यलढयातील अनेक प्रसंगांची तपशिलवार माहिती तसेच दूर्मिळ छायाचित्रे आहेत. या कॉफीटेबल बुकच्या मुखपृष्ठावर `Life of Nehru Fragrance that still remains `( नेहरुंचा जीवनपट- सुगंध अजून दरवळतो आहे) असे लिहिले आहे. हे वाचतांना या खोलीत स्वातंत्र्यलढयातील घटनांबरोबरच देशभक्तीचा सुगंध अजूनही दरवळत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

१४९० मध्ये अहमद निजामशाहने निर्माण केलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून जमिनीवर बांधलेला एकमेव किल्ला आहे. तेव्हा या भुईकोट किल्ल्याला आपण सर्वानी जरुर भेट दिली पाहिजे..


  • देवेंद्र पाटी
  • शनी-शिंगणापूर



    अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.

    कथा

    येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.
    येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेलवाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.

    साईबाबा



       श्री बाबांचा जन्म महाराष्ट्रातील पाथरी या खेड्यात भुसारी कुटुंबात झाला. पण ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लीम फकिराने केले. नंतर बारा वर्षे त्यांनी योग्यांच्या सहवासात राहून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. साधना करण्यातही त्यांनी काही काळ व्यतीत केला. नंतर ते हुमणाबादच्या श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना आशीर्वाद मिळून शिर्डी येथे राहण्याची त्यांना आज्ञा झाली. माणिक प्रभू यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले होते. प्रभू हे प्रत्यक्ष परमेश्वरच होते. बाबा त्यांना मानत होते.  
     
         औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावची चांदभाई ही एक श्रीमंत व्यक्ती. औरंगाबादची सफर करण्यास चांदभाई गेला असता त्याची घोडी हरवली. त्याने सर्व जंगल शोधले, परंतु घोडी त्याला सापडली नाही. निराश बनून खोगीर पाठीवर मारून तो परत जाऊ लागला. एवढ्यात ''चांदभाई !'' अशी हाक त्याच्या कानी आली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. त्याच्या दृष्टीस एक तरुण फकीर दिसला. अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकडे ये.'' अस म्हणून तो फकीर एका झाडाखाली बसला. 'याला माझे नाव कसे माहित? याला मी पूर्वी कधी पाहिलेलं नाही!' असा विचार करीत तो त्यांच्याकडे गेला.
     
         ''बराच थकलेला दिसतोस ! बैस जरा. चिलीम पिऊन जा. काय रे, हे खोगीर कसे तुझ्याकडे?'' तो म्हणाला, ''माझी घोडी हरवली आहे. ती सापडण्याची आशा  उरलेली नाही ! सर्व जंगल धुंडाळले!'' बाबा म्हणाले, ''ते पलीकडे कुंपण आहे. तिथ जा. तुझी घोडी सापडेल.'' चांदभाई तेथे गेला. त्याची ती हरवलेली घोडी तेथेच चरत होती. ''या अल्ला, माझी घोडी सापडली.'' चांदभाईला आनंद झाला. ती घोडी घेऊन तो फकिराकडे आला. फकीर तंबाखू चुरीत होता. ''सापडली न घोडी! आता चिलीम ओढ!'' फकिराने चिलमीत तंबाखू भरली. ''पण ही पेटवणार कशी? इथे विस्तव कुठे आहे? शिवाय छापी भिजवायला पाणीही नाही.'' चांदभाई म्हणाला.
     
         फकिराने हातातील सटका जमिनीत खुपसताच आग उत्पन्न झाली. त्यातून रखरखीत निखारा बाहेर काढला. सटका जमिनीवर आपटताच त्यातून पाणी निघू लागले. छापी भिजवून ती पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. चिलमीतील तंबाखूवर तो प्रदीप्त निखारा ठेवला. फकिराने चिलीम स्वतः ओढून चांदभाईला ओढण्यास दिली. चांदभाई स्तिमित झाला. त्याने त्या फकिराच्या पायावर मस्तक ठेवले. 
     
         ''अल्ला मलिक !'' असे म्हणून बाबांनी चांदभाईला वर उठवले व ''अल्ला भला करेगा'' असा आशीर्वाद दिला. ''बाबा, तुम्ही माझ्या घरी चला !'' ''जरूर येईन मी !'' चांदभाई तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी तो फकीर धूपखेडे गावात गेला व चांदभाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. चांदभाई खुश झाला. फकिराचे त्याने आदराने स्वागत केले. उत्तम प्रकारे आतिथ्य केले. काही दिवस तो फकीर त्याच्याकडे राहिला. नंतर चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याची सोयरिक शिर्डीच्या एका मुलीशी झाली, तेव्हा तो फकीर चांदभाईच्या विनंतीला मान देऊन लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीस आला. वऱ्हाड घेऊन आलेल्या गाड्या खंडोबाच्या देवळापाशी असलेल्या मळ्यात थांबल्या. सर्वजण गाड्यातून उतरले. तो फकीरही उतरला व खंडोबाच्या देवळात गेला. तिथे म्हाळसापती खंडोबाचे भक्त पुढे आले व आदराने म्हणाले, ''या साई!'' तो तरुण फकीर म्हणजेच साईबाबा. 
     
         बाबा  शिर्डी येथेच राहत. शिर्डीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत. त्यांना कोणी त्यांच्याबद्दल विचारले असता, ''हम तो साई है, बहुत दूरसे आये है!'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय?'' यावर बाबा म्हणाले, ''मला साईबाबा म्हणतात.'' 
     
         बाबा कधी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत, तर कधी तिथल्या पडक्या मशिदीत जाऊन बसत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना व चार वर्णांना तिथे सर्वच द्वारे खुली असतात. त्या परम पवित्र मंगल स्थानाला तत्त्ववेत्ते विद्वान 'द्वारका' म्हणतात. साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत येत. 
     
         ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. तेथे शिरताना समोरची जी भिंत दिसते ती कृष्णाची. गोपालकृष्ण गोकुळात गोपालांसह काल्याचा आनंद उपभोगीत. बाबासुद्धा नाना प्रकारच्या जिनसा आणून त्या एकत्र करून एका मोठ्या हंडीत चांगल्या शिजवून आपल्या भक्तांना स्वतः वाटीत असत. एकदा चुलीजवळ शंभराहून अधिक माणसांना पुरेल इतकी मोठी हंडी शिजत होती. चुलीखाली लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आपल्या एका भक्ताला म्हणाले, ''अरे, बघत काय राहिलास? जरा ती हंडी ढवळ!'' तेव्हा तो भक्त उलथणे शोधू लागला. बाबा झटकन त्या हंडीकडे गेले व आपल्या कफनीच्या अस्तन्या वर करून आपला उजवा हात कोपरापर्यंत त्यांनी त्या हंडीत घातला व ते पदार्थ ढवळू लागले. बाबांच्या हाताला काही झाले नाही. बाबांचे जीवनकार्य हा एक चमत्कार होता.
     
         बाबांना दीपोत्सवाची मोठी हौस होती. बाबा टमरेल घेऊन दुकानदार वाण्यांकडे जात व त्यांच्याकडून तेल मागून आणत. पण त्यांना ते मनापासून देत नसत. बाबा ते तेल पणतीमधे भरी. चिंध्या काढून त्याच्या वाती वळीत. रात्री त्या मशिदीत पेटवित. त्या रात्रभर जळत असत. दिवाळीचा सण होता. बाबा नेहमीप्रमाणे सर्व दुकानदार वाण्यांकडे गेले. त्यांना कुणी तेल दिले नाही. ''आज तेल नाही. संपले.'' असेच त्यांना सर्वच दुकानदार वाण्यांनी सांगितले. बाबा निमूटपणे मशिदीत आले. आता हा फकीर मशिदीत कशा पणत्या पेटवतो हे पाहण्यासाठी ते सर्वजण मशिदीसमोर जमले. बाबांनी त्यात पाणी ओतले. आणि कांडे ओढून ते एक एक पणती पेटवू लागले. मशिदीत दीपमाळा उजळली. मजा पाहण्यासाठी आलेले दुकानदार बाबांच्या चरणी लीन झाले. 
     
         आजारी माणसे, रोगपीडित माणसे बाबांकडे येत. बाबा त्यांना वनस्पतींपासून स्वतः बनवलेली औषधे देऊन बरे करीत असत. जेव्हा जास्तच गर्दी वाढू लागली, तेव्हा बाबा औषधाऐवजी धुनीची उदी सर्वांना देऊ लागले आणि आलेले बरे होऊ लागले. भक्तांचे दुःख आणि दुखणे आपल्या अंगावर ओढून ते स्वतःच भोगीत असत. पुष्कळदा ते अनेक व्याधींनी जर्जर असत. भक्तांचे दुर्धर असाध्य रोग आपल्या अंगावर घेऊन ते भयंकर शारीरिक दुःख स्वतःच भोगीत. दाह व वेदना ते सहन करीत व भक्तांना वाचवीत. बाबा भक्तांना त्यांच्या स्वप्नात आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना उदी लावीत असत.
     
         बाबा भक्तांच्या संकटसमयी त्यांना सहाय्य आणि दिलासा देण्यासाठी दिशा आणि काळाची बंधने तोडून हजारो मैलांवर तत्क्षणी प्रकट होत. आपल्या असंख्य भक्तांना निरनिराळ्या रूपांनी प्रकट होऊन बाबांनी वाचविले आहे.      
        
         पुढे बाबा आजारी पडले. त्यांचे दुखणे प्रबळ झाले. भक्त तळमळू लागले. १५ ऑक्टोबर १९१८ हा दिवस उजाडला. त्या दिवशी विजयादशमी होती. बाबांची अवस्था कठीण होती. काही क्षणानंतर बाबांनी जवळच बसलेल्या बयाजी अप्पा कोते यांच्या अंगावर डोके टेकले. संपले सारे ! 
     
    शिर्डीस ज्याचे लागतील पाय l
    टळती अपाय सर्व त्याचे ll
    माझ्या समाधीची पायरी चढेल
    दुःख हे हरेल सर्व त्याचे ll